विज्ञानाशी जडले नाते… अभिजात पुस्तकांचे
पुस्तकांमध्ये बंदिस्त झालेले विज्ञान जर आपल्यापुढे प्रकट झाले तर ? म्हणजे असे समजा की अनेक पुस्तकांमधून आपण यंत्रमानव आणि त्याने केलेली अनेक अचाट कामे, त्याचे हात,पाय, व तल्लख मेंदू पुस्तकातल्या कुठल्या न कुठल्या पानांवर वाचले असतेच. परंतु तोच यंत्रमानव म्हणजेच रोबो जर आपल्या पुढे प्रत्यक्षात समोर उभा ठाकला तर ? आणि समजा आपणच त्या रोबोला बनवले तर ? खोटं वाटतं ना ? पण ते प्रत्यक्षात खरं होणार आहे मित्रांनो. आपल्या व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांना देखील अशाच विज्ञान गोष्टींनी एकेकाळी भारावून टाकले होते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ‘मनोरंजनाकडून विज्ञानाकडे’ या व्याख्यानमालेतून चक्क २५० व्याख्यानांतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विज्ञानाकडे उघड्या डोळ्याने पहावे आणि आपण प्रगल्भ व्हावे, सक्षम व्हावे हाच ध्यास घेऊन त्यांनी दोन मराठी आणि एक इंग्रजी वैज्ञानिक मासिक केवळ विद्यार्थ्यांसाठी चालवले. सूर्यग्रहण या विषयावर ठिकठिकाणी व्याख्याने दिली. यथावकाश निलेशजी प्रकाशन व्यवसायात स्थिरावले, बहरले मात्र ही विज्ञानाची गोडी त्यांना काही स्वस्थ बसू देई ना. त्यांनी स्थापन केलेल्या व्यास क्रिएशन्स या वृक्षाला उत्तमोत्तम ग्रंथांची रसाळ फळे आली. आणि अगदी अगदी अकल्पितपणे त्यांचाच एक जिवलग मित्र ज्याचे ऑफिस व्यास क्रिएशनच्या कार्यालयाजवळच आहे, तो निलेशजींना भेटतो काय, आपण स्थापन केलेल्या विज्ञान संकल्पनेची गोष्ट सांगतो काय आणि निलेशजी भारावून जातात काय ? सारंच विलक्षण. .
आणि..आज खऱ्या अर्थाने बालदिनाच्या निमित्ताने हे दोन परममित्र, एकत्र भेटले, आणि त्यांनी ठरवलेदेखील. एक स्वप्न साकारण्याचे. ज्यातील एकाला वेड आहे उत्तमोत्तम ग्रंथांच्या निर्मितीचे तर दुसऱ्याचे स्वप्न आहे विज्ञानाची गंगा प्रत्यक्षात आपल्या दारी आणण्याचे. अशा तऱ्हेने विज्ञानाशी जडले नाते… अभिजात पुस्तकांचे हे बोध वाक्य प्रत्यक्षात साकारले.
पुरुषोत्तम पाचपांडे… विज्ञानाचे स्वप्न उराशी बाळगून हे ज्ञान विद्यार्थ्यांच्या ओंजळीत पडावे, त्यामधून भावी शास्त्रज्ञ उदयाला यावा यासाठी अहोरात्र झटणारा एक अवलिया. मुलांमधील विज्ञान विषयक चळवळीला वाव मिळावा त्यांच्यामध्ये जिज्ञासा उत्पन्न व्हावी, आत्तापर्यंत जे पुस्तकात वाचत आले आहोत त्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्या समोर पाहायला मिळावीत आणि त्यातून काहीतरी नवीन, अभिनव असे त्याच्याकडून निर्माण व्हावे, केवळ यासाठीच पाचपांडे यांनी ठाण्यात प्रथम ‘चिल्ड्रन टेक सेंटर’ सुरु केले. गायन, वादन, नृत्य या कलांबरोबरच ‘तंत्रज्ञान’ ही देखील एक कला असून ती विद्यार्थ्याने आत्मसात केली तर बिघडले कुठे? असा दूरदर्शी विचार केल्यामुळे पाचपांडे यांच्या या धडपडीला चांगलेच यश मिळू लागले. आत्तापर्यंत पुस्तकात बंदिस्त झालेली तंत्रज्ञानाची कवाडं या अभिनव प्रयोगामुळे उघडली गेली. प्रॅक्टिकल शिक्षणामुळे या संस्थेत विदयार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना सोप्या आणि शास्त्रीय भाषेत उत्तरे मिळू लागली. हेच या ‘चिल्ड्रन टेक सेंटर’ चे खरे यश.
हे सेंटर साकारण्यासाठी, ही कल्पना मूर्त स्वरूपात ( सेट-अप ) येण्यासाठी श्री पाचपांडे यांनी सुरवातीस IIT, मुंबई मधील काही तंत्रज्ञांची मदत घेतली. टेक्नॉलॉजी आणि हॉबी (छंद) या मध्ये एक अस्पष्ट सीमारेषा असते ती या सेंटरमुळे पुसून गेली. आपल्या कडील शाळांमध्ये काही ठिकाणी सायन्स लॅब असतात. मात्र तिथे काम करण्याची अथवा तेथील गोष्टी पारखण्याची संधी मात्र रोज काही मिळत नाही. विद्यार्थ्यांना प्रचंड उत्सुकता असते मात्र शाळा त्या पूर्ण करू शकत नाही अशी परिस्थिती असताना एखादी मोठी सेवाभावी संस्था, ट्रस्ट, मोठी गृहसंकल, सोसायटी यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना कायम स्वरूपाची सुसज्ज लॅब मिळाली तर ? ‘चिल्ड्रन टेक सेंटर’ ही संस्था अशा संस्थांना अद्ययावत लॅब पूर्ण सेट-अप करून देऊ शकते. त्यासाठी संस्थेने ‘एडिसन क्लब’ ची संकल्पना अमलात आणली. या क्लबच्या मार्फत विद्यार्थ्यांना रोबोटिक टेक्नोलोंजी शिकवणे, त्यांना हार्डवेयर, सॉफ्टवेयर, प्रोग्रामिंग, ड्रोन्स याचेही ज्ञान उपलब्ध करून देणे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. आजघडीला महाराष्ट्रात एकूण पस्तीस एडिसन क्लब कार्यरत आहेत, त्यामधून अनेक विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. आता तर संस्थेने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यामध्ये असे क्लब सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आत्तापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांनी या संकल्पनेचा लाभ घेतला. ही संख्या एक लाखापर्यंत वाढवणे हे संस्थनेचे उद्दिष्ट आहे.
मिसाईल मॅन , थोर शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी सन २०२० पर्यंत भारताला एक स्वयंपूर्ण, विकसित देश बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. ते लवकरच पूर्ण होणार. विज्ञानाचा ध्यास घेणारी पुरुषोत्तम पाचपांडे सारखी मंडळी जोपर्यंत या देशात आहेत तो पर्यंत डॉ कलाम यांनी पाहिलेले स्वप्न नक्कीच साकार होईल.
अभिजात पुस्तकांच्या निर्मितीचा वसा जपणारे व्यासचे सर्वेसर्वा श्री निलेश गायकवाड आणि ‘चिल्ड्रन टेक सेंटर’ चे श्री पुरुषोत्तम पाचपांडे आज या निमित्ताने एकत्र येत आहेत हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक शुभसंकेत आहे. पुस्तकांचे महत्व आणि विज्ञानाची गोडी याचे सुंदर नाते जपले जावून उद्याचा विद्यार्थी भारतभूमीवर उगवणाऱ्या विज्ञानरूपी तेजोमय सूर्याचे स्वागत करण्यासाठी आत्मविश्वासाने नक्कीच सामोरा जाईल याची खात्री वाटते.